बंद

धार्मिक स्थळे

भक्तांची चिंता हरण करणारा कळंब येथील चिंतामणी गणेश !

 

गर्भ गृहातील चिंतामणी

श्री गणेशोत्सव : दर्शन, शास्त्र अन् इतिहास

केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारतवर्षाचे आराध्यदैवत श्री गणेश ! गणेशोत्सवाच्या कालावधीत ब्रह्मांडातील श्री गणेशाचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी अधिक प्रमाणात पृथ्वीतलावर येत असते. गणेशोत्सवासंदर्भात एक विशेष सूत्र असेही आहे की, हा उत्सव जागतिक स्तरावर सर्वांत मोठा उत्सव म्हणून सुविख्यात आहे.

महाराष्ट्रातील २१ गणेश क्षेत्रांपैकी एक आणि विदर्भातील अष्ट गणेशांपैकी एक म्हणजे कळंब येथील श्री चिंतामणी ! चिंतामणीची ही मूर्ती साक्षात् इंद्रदेवाने स्थापिली आहे. चिंतामणी गणेश मंदिर गावाच्या भू-पातळीपासून ३३ फूट खोल आहे. गाभार्‍यात उतरण्यासाठी चिरेंबदी दगडाच्या २९ पायर्‍या आहेत. खाली उतरल्यावर पाण्याचे एक चिरेबंदी अष्टकोनाकृती कुंड आहे. मुख्य गाभार्‍यात चिंतामणी गणेशाची साडेचार फूट उंचीची विलोभनीय आणि नयनरम्य मूर्ती विराजमान आहे. ती मूर्ती दक्षिणाभिमुखी आहे.

श्रीगणेशपुराण आणि श्रीमद् मुद्गलपुराण यांत उल्लेखित असा हा चिंतामणी आहे. महर्षि गौतम ऋषींनी इंद्रदेवास शापमुक्त होण्यासाठी विदर्भातील कदंबक्षेत्री जाऊन श्री गणेशाची तपश्‍चर्या करण्यास सांगितलेले ते हेच कळंब, तथा इंद्राच्या घोर तपश्‍चर्येने प्रकट झालेले श्री गणेश येथेच ! इंद्रास शापमुक्त करणारा चिंतामणी गणेश भक्तांना चिंतामुक्त करणारा होय. देवराज इंद्रानेश्री गणेश पूजनास्तव पृथ्वीजल न वापरता प्रत्यक्ष स्वर्गातून श्री गंगेला आवाहन करून त्या पाण्याने श्री पूजन केले आणि प्रत्येक १२ वर्षांनी श्री गंगेस श्रीचरण धुत रहाण्यास सांगितले. त्यानुसार प्रत्येक १२ वर्षांनी येथील कुंडातील पाण्याची पातळी वाढते आणि श्री चिंतामणीचा पदस्पर्श झाला, की पाण्याची पातळी आपोआप न्यून होऊ लागते. अशा घटना वर्ष १९१८, १९३३, १९४८, १९५८, १९७०, १९८३, १९९५ या वेळी अनुभवास आल्या.

कदंब ऋषींचा आश्रम येथे होता. श्री मूर्तीची स्थापना कदंब ऋषींनी केली, असे गणेश आणि मुद्गलपुराणात उल्लेखित आहे. रामायण पूर्व काळापासून कदंब हे शहर प्रसिद्ध आहे.

गाभा-यासमोरील अष्टकोनी कुंडात प्रत्येक १२ वर्षांनी गंगा येते. कुंडातील पाण्याची पातळी वाढते आणि समोर असलेल्या गाभार्‍यातील श्रीचरणांचा स्पर्श झाला, की कुंडातील पाणी आपोआप ओसरू लागते.

 

हिंदू-मुस्लीम एकात्मतेचे प्रतिक कंबलपोश बाबाचा दर्गाह !

 

दर्ग्याचा बाह्य भाग

अरुणावती नदीच्या तीरावर वसलेले हे शहर असून या ठिकाणी बाबा कंबलपोष यांची मोठी यात्रा (उर्स-शरीफ) भरते. मुस्लीम बांधव मोठ्या थाटात हा उत्सव साजरा करतात. तीन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. ह्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीची उलाढाल होते. विविध ठिकाणाहून आलेले फिरते चित्रपट गृहे, सर्कस, नाना प्रकारचे आकाश पाळणे इत्यादी मनोरंजनाच्या साधनांमुळे अबाल वृद्धा करिता पर्वणीच ठरते. मिठाईचे व खेळण्यांचे बरेच दुकाने येथे थाटल्या जातात. हिंदू-मुस्लीम व इतर धर्मीय या ठिकाणी येवून दर्ग्यावर चादर चढवितात व आशीर्वाद घेतात. राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन आवर्जून या ठिकाणी पहावयास मिळते.

श्री जगदंबा संस्थान केळापूर

 

नवरात्री उत्सवातील श्रींची मूर्ती

आंध्र महाराष्ट्राच्या सीमेपासून २० कि.मी. अंतरावर व पांढरकवडा या तालुक्याच्या ठीकाणापासून केवळ ४ कि.मी. अंतरावर राष्ट्रीय महामार्ग ७ या महत्वाच्या हैदराबाद – नागपूर रस्त्यावर केळापूर या छोटेखानी गावी मॉ जगदंबेचे अति प्राचीन हेमाडपंथी प्राचीन मंदीर आहे. ही जगदंबा अतिशय जागृत असून आंध्र प्रदेश व विदर्भातील दूरवरुन भाविक मोठ्या संखेने येथे दरवर्षी येत असतात. तरी वर्षानुवर्षे हे मंदिर उपेक्षीत होते.

१९८८ मध्ये श्री जगदंबा संस्थान केळापूर पब्लिक ट्रस्ट म्हणून घोषीत करण्यात आले व संस्थान्चे परीसरांत अनेक सावलीच्या व शोभिवंत फुलझाडांची लागवड करून मंदीर परिसराचे सौंदर्य वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दुरवरून येणार्या भाविकांसाठी भक्त निवास / मंगलकार्यालय, मुलांसाठी बाल उद्यान आदिंच्या सोयी केल्या आहेत.

२ ऑक्टो १९८२ रोजी श्री. संत ईस्तारी महाराज (किन्ही) यांचे प्रमुख उपस्थितीत व घाटंजी, पांढरकवडा य दोन्ही तालुक्यातील अनेक भाविक नागरिकांचे उपस्थितीत मॉं. जगदंबेच्या प्रेरणेने मंदीराचे जीर्णोध्दाराच्या भूमीपूजनाचा सोहळा थाटात पार पडला. १९८२ ते १९८७ पर्यंत एकता मंडळ जीर्णोध्दार समीतीच्या वतीने भाविकांकडून सार्वजनिक रुपात वर्गणी गोळा करुन जीर्णोध्दाराचे कार्य करण्यात आले.

.